आक्षेपहार्य पोस्टबद्दल ऍड. मळवीकर यांच्यावर गुन्हा दाखल

चंदगड :

चंदगड पोलीस ठाण्याकडून कायदा व सुव्यवस्थेचे योग्य पालन करत अवैद्य धंद्याविषयी कठोर कारवाई करून तो पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करत संबंधितांच्यावर कारवाई करण्यात आली असताना देखील ॲड. संतोष मळवीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चंदगड पोलीस ठाण्याबद्दल जाणीवपूर्वक आक्षेपार्य मजकूर व पोस्ट करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चंदगड पोलीस ठाण्यात ॲड. मळवीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ह्या गुन्ह्यात चंदगड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे स्वतः फिर्यादी असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला हे अधिक तपास करत आहेत. चंदगड पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार खाकी ड्रेस मधील विश्वासामुळे मटका जुगार तीन पत्ती अशा अवैध धंद्यानंतर आता चंदगड मध्ये बुधवार पेठ- ॲड. मळवीकर, चंदगडमध्ये तीस-चाळीस चोरांची टोळी, चंदगड पोलिस निवांत झोपा काढताहेत, आज पुन्हा मंदिर घरे फोडली, खाकी वर्दीतील विश्वासाने सुपारी देऊन किती दाखवला अविश्वास असे आणखिन काही मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करून ते डिलीट केले आहेत. त्यामुळे चंदगड मधील सर्व महिलांची बदनामी झाली आहे. त्यामुळे मळवीकर यांच्यावर तात्काळ प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा चंदगडचे सुरेश सातवणेकर, अक्षय सबनीस, फिरोज मुल्ला, प्रवीण फगरे, अभिजीत गुरबे, सचिन बल्लाळ, विजय कडुकर, महादेव वांद्रे, राजाराम सुके, मोहसीन नाईक, सिद्धार्थ कोरेगावकर, अभिजीत कुट्रे, तसेच इतर जवळपास पन्नास नागरिकांनी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची भेट घेऊन चर्चेवेळी दिला. या सर्वांची माहिती घेतली असता ॲड. संतोष मळवीकर यांनी पोलीस दलाचे बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हॉटसअप, फेसबुक, इलेक्ट्रॉनिक मिडिया तसेच साप्ताहिक रोखठोक आवाज या साप्ताहिकाच्या माध्यमातून बदनामीकारक मजकूर प्रसिद्धी केल्याचे प्राथमिक स्वरूपात निर्देशनास आल्याने गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. समाजासाठी वेळोवेळी आंदोलन करून स्वतःवर एकशे पन्नास पेक्षा अधिक कोर्टाच्या केसेस अंगावर घेणाऱ्या ॲड. संतोष मळवीकर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे स्वतःच चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी फिर्याद दिल्याने चंदगड तालुक्यात अनेक चर्चेचे गुऱ्हाळ रंगले आहे.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube