शिवाजी पाटील यांची नेसरी येथील बैठकीत ग्वाही
चंदगड :
चंदगड मतदारसंघ हा दुर्गम, डोंगरवाड्या वस्त्यांचा भाग आहे. आजही धनगरवाड्यांवरच्या माझ्या माताभगिनींना प्रसुतीसाठी झोळीतून नेण्याची वेळ येते. एखाद्या वृद्धाला आपत्कालीन वेळी डालग्यातून न्याव लागतं. साप, विंचू, जंगली जनावरं यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यावर देखील सुविधाविना अनेकांना जीव गमावावा लागतो आहे. अशा बिकट परिस्थिती असतानाही याकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आतापासूनच १३ धनगरवाडे हे मी दत्तक घेतल्याची ग्वाही शिवाजीराव पाटील यांनी दिली. नेसरी येथील बैठकीत ते बोलत होते.
आज केवळ चंदगड तालुका दुर्गम, मागास म्हणून फक्त त्याचा राजकारणासाठी वापर करण्याचा उद्योग सुरू आहे. इथल्या लोकांना मतांसाठी फसवल जात आहे. केवळ व्होट बँक म्हणून या वाड्या वस्त्यांना पाहिलं जातं. आजपर्यंत या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात कधी या गोर गरिबांच्या समस्या दिसल्या नाहीत का? या डोगरकपारीत साधे रस्ते करता आलेले नाहीत. तर वैद्यकीय सुविधा तरी लांबची गोष्ट आहे. त्यामुळेच हे धनगरवाड्यांचा संपूर्ण कायापालट करून माझ्या माता-भगिनींना प्रामुख्याने आरोग्याच्या सुविधा पुरवणार असल्याचा शब्द पाटील यांनी दिला. त्यासाठी या राजकीय लढाईत साथ द्या, पहिला निधी या कामाला लावून माझ्या कामाला सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
चंदगड मतदारसंघात खास करून चंदगड तालुक्यासाठी आरोग्य व्यवस्था ही खूप महत्वाची गरज आहे. आज कसल्याही आरोग्य समस्येसाठी एक तर बेळगांव किंवा गडहिंग्लज, कोल्हापूरकर अवलंबून राहावे लागते. एखादा मोठा अपघात झाला तर दवाखान्यात जाईपर्यंत जीव जाण्याची वेळ येते. त्यासाठी एखाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची गरज आहे. ट्रॉमा केअर सेंटर अनेक वर्षापासून होतंच आहे. त्यालाही गती देण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वात आधी चंदगडची आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे आव्हान आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून लवकरच एक सुसज्ज असे हॉस्पिटल उभाणार आहे. त्यासाठी मला तुमच्या मताची ताकद हवी आहे. ती तुम्ही नक्की द्याल यात मला काडीमात्र शंका नाही. याच विश्वासावर मी या निवडणुकीत उतरलो असल्याचे पाटील म्हणाले.