डॉ. नंदाताई बाभुळकर
चंदगड /प्रतिनिधी
सध्याची सामाजिक परिस्थिती पाहताना मुलांवर संस्कार करण्यास आपण कुठेतरी कमी पडतो. आजचा संवाद युवकांशी आहे. त्यांच्यासमोर चांगले उदाहरण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे नाव असू शकत नाही. समाजात बदल घडवायचा असेल तर प्रत्येक घरात शिवराय, जिजामाता, ताराराणी जन्माला येणे आवश्यक आहे. समाज व्यवस्था बदलण्यासाठी तरुणाईने राजकारणात यावे, असे प्रतिपादन डॉ. नंदाताई कुपेकर बाभुळकर यांनी केले. त्या बाबासाहेब कुपेकर फाउंडेशन व ज्ञान ग्रुपतर्फे मजरे कारवे येथील स्वराज्य सभागृहात सोमवारी (दि. 30) आयोजित शिवव्याख्यान आणि वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमात बोलत होत्या. बाभुळकर पुढं म्हणाल्या, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी बालवक्त्यांनी सभागृहातील उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. या मुलांमध्ये भविष्यातील प्रा. बानुगडे पाटील दिसत आहेत, सध्या संस्कार करताना पालक कमी पडत असल्याचे चित्र आहे.माझ्या शालेय जीवनात केशवसुतांची एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने ही कविता पाहिल्यांदा सादर करण्याची संधी मिळाली. आज मी आत्मविश्वासाने म्हणू शकते. पण त्यावेळी ही कविता कशीबशी संपवली. पण नियतीचा खेळ असतो. आता व्यासपीठ मिळाले. आणि कदाचित तुतारी पण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी व प्रसिद्ध इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले आपल्या यशावर यश ठरत नाही तर किती जणांना आपण यशापर्यंत जाण्यासाठी मदत केली त्यावर आपलं यश अवलंबून असत. तोच वारसा बाबा साहेब कुप्पेकर यांच्या कन्या नंदाताईनी जपला आहे.शिवाजी महाराज्यांच राजकारण हे नैतिक राजकारण होतं.राज्यात चाललेलं राजकारण हे घातक आहे. त्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करा. तरच राज्य स्वराज्याप्रमाणे राज्य उभ राहील असे अहवान केले. यावेळी सहभागी स्पर्धेत प्रथम क्रमांक रणजित सुनीता राजाराम कागणकर (तावरेवाडी ता. चंदगड ) ऋतुजा जोतिबा करटे (शिनोळी खुर्द) तर तृतीय, अर्पिता अनिल पाटील, (हेब्बाळ जलघाळ,ता . गडहिंगलज ) यां विजेत्यांना गौरवण्यात आले. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रा. किसनराव कुऱ्हाडे, शिवसेना नेते प्रभाकर खांडेकर, रियाजभाई शमनजी, शिवाजी सावंत, रामराजे कुपेकर, विष्णू गावडे, बसवंत अडकुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.