तुडये /वार्ताहर
तुडये, ता. चंदगड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे बँक मॅनेजर देवर्षी तिवारी व क्लार्क कुणाल सचदेवा यांची चार महिने होण्याआधीच बदली झाल्याने ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विभागीय कार्यालय कोल्हापूर यांच्याकडून तातडीने बदली रद्द करावी यासाठी तुडये, हाजगोळी, कोलिक, सरोळी, म्हाळुंगे, ढेकोळी, सुरुते व सीमाभागातील गावातील ग्राहकांनी मागणी केली आहे. तिवारी व क्लार्क सचदेवा हे शाखेत हजर झाल्यापासून त्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा दिली असून शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारी केवायसी रात्री उशिरा पर्यंत करीत आहेत. दैनंदिन आर्थिक व्यवहार, उद्योग, व्यवसायचे आर्थिक व्यवहार, कृषी कर्ज, शैक्षणिक कर्ज, बचत गटांना अर्थसहाय व मार्गदर्शन करत आहेत . त्यात अधिकाऱ्यांची अचानक बदली झाल्याने परिसरातील ग्रामपंचायती, सहकारी संस्था, व्यवसायिक, ग्राहक व नागरिकांनी बदल्या थांबवा अन्यथा आंदोलनचा इशारा दिला आहे. ग्राहकांच्या मागणीचा विचार करून विभागीय कार्यालयाने श्री. तिवारी व श्री. सचदेवा यांच्या बदल्या तातडीने रद्द कराव्यात अशी मागणी होत आहे. यासाठी हर्षवर्धन कोळसेकर, परशुराम मोहिते, प्रकाश गुरव, विक्रम पाटील, रजत हुलजी, विनायक पवार, उत्तम पाटील, मितेश पाटील यांनी कोल्हापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या विभागीय कार्यालयात भेट देऊन बदली रद्द करण्यासाठी निवेदन दिले. यासाठी तुडयेचे सरपंच विलास सुतार, हाजगोळीच्या सरपंच शीतल पवार, कोलिकच्या सरपंच, आशा गावडे, सरोळीच्या सरपंच विठाबाई उसणकर, ढेकोळीचे सरपंच ज्ञानेश्वर नाईक, सुरुतेचे सरपंच मारुती पाटील यांनीही बदली रद्द करावी यासाठी ठरवाद्वारे मागणी केली आहे.