चंदगड : शिकारीच्या उद्देशाने माडवळे जंगल परिसरात फिरणाऱ्या दोघांना पाटणे वनविभागच्या पथकाने ९९ जिवंत बाॅम्ब, सतूरसह अटक केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. मारुती बाबू लाडलक्ष्मीकार वय ३१, रा. शिरगाव, महेश तुकाराम सावंत ( वय २९ रा. हलकर्णी ) यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी पाटणे वनविभागाचे पथक माडवळे जंगल परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी एमएच ०९ सीएन १८६७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून हे दोघे संशयितरित्या त्या परिसरात फिरत असताना आढळले. त्यानंतर त्यांची झाडाझडती घेतली असता शिकारीसाठी वापरले जाणारे ९९ जिवंत बॉम्ब व एक सत्तूर त्यांच्याकडे मिळून आले. यासह आरोपींचे दोन ॲन्डरॉईड मोबाईल जप्तही केले आहेत. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता आरोपींना दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. ही कारवाई वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे, वनपाल बाळासाहेब भांडकोळी, वनपाल जॉन्सन डिसोजा, वनरक्षक प्रकाश मारुती शिंदे, मेघराज हुल्ले, खंडू कातखडे, गणेश भालेराव, श्रेयस रायके, विश्वनाथ नार्वेकर शुभम बांदेकर यांच्या पथकाने केली.
पाटणे येथील वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे व त्यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आहे.