चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचा दिवाळी विशेष ग्रंथदान उपक्रम; सहा वाचनालयांना पुस्तके भेट

चंदगड (प्रतिनिधी): मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करत चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाने दिवाळीच्या निमित्ताने सहा सार्वजनिक वाचनालयांना पुस्तक भेट देण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवला. हा उपक्रम महात्मा फुले विद्यालय, मजरे कारवे येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य एम. एम. गावडे यांनी भूषवले. त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, मराठी भाषेचे संवर्धन आणि वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

चंदगड तालुक्यातील सहा वाचनालयांना या उपक्रमात पुस्तके भेट देण्यात आली, ज्यामध्ये ज्ञानज्योत सार्वजनिक वाचनालय, शिनोळी बु. (परशराम गुंडू पाटील), सरस्वती वाचनालय, मौजे कर्वे (दत्तात्रय यल्लाप्पा कांबळे), माणकेश्वर वाचनालय, माणगाव (अशोक बेनके), जय हनुमान वाचनालय, कुर्तनवाडी (प्रा. चांदेकर), कलमेश्वर वाचनालय, कालकुंद्री (के. जी. पाटील) आणि शिवनेरी वाचनालय, कोवाड या वाचनालयांचा समावेश होता.

सदर पुस्तके कवी संजय साबळे, कवी जयवंत पाटील, कथाकार बी. एन. पाटील आणि के. जी. पाटील यांनी मराठी अध्यापक संघाला भेट दिली, ज्यामुळे हा ग्रंथदान उपक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. एन. शिवणगेकर यांनी केले. कवी संजय साबळे यांनी मराठी अध्यापक संघाचे विविध शैक्षणिक उपक्रम आणि वर्षभरात राबवले जाणारे प्रकल्प याविषयी सविस्तर माहिती दिली.

चंदगड मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष रवी पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे महत्त्व पटवून देत, तालुक्यातील इतर वाचनालयांनाही टप्प्याटप्प्याने ग्रंथदान करण्याचा मानस असल्याचे सांगितले. त्यांनी या उपक्रमाद्वारे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचे नमूद केले.

“वाचन संस्कारातून ज्ञानाचा प्रवाह वाहत असतो .वाचन संस्कृती ही केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर विचारांचा विस्तार आणि मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा शोध घेण्याची प्रक्रिया आहे. यांचे दिवाळी निमित‘ग्रंथदान उपक्रम’ हा या विचाराचा मूर्त स्वरूप आहे. वाचन संस्कारांचे महत्त्व त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे, आणि त्यांचा हा उपक्रम समाजातील वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन घडविणारा ठरतो.” असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रकाश दुकळे यांनी केले. मराठी अध्यापक संघाच्या ग्रंथवाटप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी द. य. कांबळे म्हणाले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाचे महत्त्व घटते आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने वाचनाची जागा झटपट माहितीने घेतली आहे, परंतु त्या झटपट माहितीचा गाभा किती अर्थपूर्ण आणि विचारशील आहे, हे तपासणे आवश्यक आहे.
मराठी अध्यापक संघाच्या या उपक्रमाने याच मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. ”

कार्यक्रमाला अध्यापक संघाचे संजय साबळे कमलेश कर्निक, एस. पी. पाटील, राजेंद्र शिवणगेकर, सौ. कर्निक,बाळाराम कदम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. आर. पाऊसकर यांनी केले तर आभार रवी पाटील यांनी मानले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरले असून, वाचन संस्कृतीचा विकास करण्यासाठी सर्वत्र अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे सर्व उपस्थितांनी नमूद केले.

You cannot copy content of this page

Facebook
YouTube